असं थांबवू शकतो बाल लैंगिक शोषण

जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगातील सर्वात जास्त बाल लैंगिक शोषितांची संख्या भारतामध्ये आहे. ह्यामध्ये ० ते १८ वयोगटातील मुलांचा समावेश होतो. भारतातील आकडेवारीनुसार, प्रत्येक दुसरं मूल हे लैंगिक शोषणाला बळी पडत [...]

जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगातील सर्वात जास्त बाल लैंगिक शोषितांची संख्या भारतामध्ये आहे. ह्यामध्ये ० ते १८ वयोगटातील मुलांचा समावेश होतो. भारतातील आकडेवारीनुसार, प्रत्येक दुसरं मूल हे लैंगिक शोषणाला बळी पडत असते. मुळात लैंगिक शोषण हे स्पर्शित आणि अस्पर्शित अशा दोन प्रकारांत होत असते आणि त्याचा परिणाम म्हणजे मुले नैराश्याच्या जाळ्यात ओढली जाऊ शकतात, समाजापासून दूर होऊ शकतात आणि त्यांना कोणावरही विश्वास ठेवणे कठीण जाऊ शकते. अशावेळी शाळेमार्फत वैयक्तिक सुरक्षा शिक्षणाचा अभिनव कार्यक्रम घेतला जाऊ शकतो कारण शाळा ही मुलांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे.

पण शाळा हे कसं करणार?

बाल लैंगिक शोषणाला प्रतिबंध करण्यासाठी ‘अर्पण’ ही सामाजिक संस्था काम करते. अर्पणने आतापर्यंत १,०४,००० पेक्षा अधिक मुलांना वैयक्तिक सुरक्षा शिक्षण ह्या कार्यक्रमाद्वारे सशक्त केले आहे. अर्पणचा वैयक्तिक सुरक्षा शिक्षण हा कार्यक्रम शाळेमध्ये राबविला जातो आणि अर्पण हा कार्यक्रम शाळेमध्ये राबविण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्यास तयार आहे. पण अर्पणला ह्या कार्यक्रमामध्ये पालक आणि शिक्षकांच्या मदतीची गरज आहे कारण मुलांच्या सुरक्षेमध्ये शाळेबरोबरंच पालकांची भूमिकासुद्धा फार महत्त्वाची आहे. आजच्या धावपळीच्या जगात पालक नेहमी आपल्या मुलांसोबत राहू शकत नाहीत. पण पालक मुलांची विचारपूस करून आणि संवादाच्या माध्यमातून मुलांच्या दैनंदिन घडामोडींना समजू शकतात. प्रत्येक पालकांनी त्यांच्या पाल्यास लैंगिक शोषणाविषयी सतर्क केले पाहिजे. शरीराच्या खाजगी अवयवांविषयी माहिती दिली पाहिजे. त्यांचा आत्मविश्वास वाढविला पाहिजे की, जर कुणी त्यांच्यासोबत काही अनुचित प्रकार केला तर त्यांना ‘नाही’ बोलून तिथून निघून गेले पाहिजे व हा प्रकार त्यांच्या आई-वडिलांना किंवा एखाद्या विश्वासू व्यक्तीला सांगितला पाहिजे. अशाप्रकारे पालक व शिक्षक मुलांना बाल लैंगिक शोषणाविषयी जागृत करू शकतात. बाल लैंगिक शोषणाबद्दल प्रौढ आणि मुलांना जागृत करण्यासाठी तुम्ही अर्पणला ९८१९०५१४४४ ह्या क्रमांकावर किंवा www.arpan.org.in ह्या वेबसाईट संपर्क साधू शकतात.