अल्पवयीनांवरील अत्याचाराच्या घटनांत वाढ मुलांसह पालकांनी सजग राहण्याचा सल्ला
खेळण्या-बागडण्याच्या वयामध्ये कधी नातलगांकडून तर कधी परिचित-अपरिचित व्यक्तींकडून होणाऱ्या अत्याचाराला बालकांना सामोरे जावे लागत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. नालासोपाऱ्यात राहणारी एक पाच वर्षांची मुलगी गुजरातमध्ये नवसारी रेल्वे स्थानकात मृतावस्थेत सापडली होती. त्यापाठोपाठच विरारमधील एका मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. दोन्ही प्रकरणांत महिलांचा संबंध असल्याचे उघड झाले. त्याहूनही विशेष म्हणजे, मुलांच्या पालकांशी असलेल्या वादातून हे प्रकार घडल्याचेही समोर येत आहे. अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराच्या अनेक घटनांमागे हेच प्रमुख कारण असल्याचे दिसून येत असल्याने आपल्या पाल्याच्या सुरक्षेसाठी पालकांनी सजग राहण्याची गरज पोलीस आणि सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
मुंबईमध्ये २०१६ मध्ये नोंदविलेल्या एकूण ६२८ बलात्काराच्या घटनांपैकी ४५५ घटना अल्पवयीन मुलींवर घडलेल्या आहेत. २०१५ मध्ये हे प्रमाण ६३ टक्के असून २०१६मध्ये यामध्ये नऊ टक्क्यांनी वाढ होऊन ७२ टक्के झाले आहे. तर राष्ट्रीय गुन्हेगारी अहवाल २०१६ नुसार, २०१५च्या तुलनेमध्ये २०१६ मध्ये बालकांवर झालेल्या गुन्ह्य़ांमध्ये ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यभरात नोंदविलेल्या एकूण गुन्ह्य़ांच्या घटनांपैकी १९.३८ टक्के गुन्हे हे बालकांवर झालेल्या लैंगिंक शोषणाचे असून मुंबईमध्ये २०१६मध्ये ४६४ गुन्हे दाखल झालेले आहेत.
बालके १२ वर्षांची होईपर्यंत त्यांची सर्व जबाबदारी ही पालकांची असते, परंतु नोकरी करत असल्यामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे बऱ्याचदा ही मुले एकटी वावरत असतात. याचाच गैरफायदा उचलण्यात येतो. अपहरण, लैंगिक शोषणासारख्या प्रकरणांत दोषी आढळलेल्या व्यक्ती बहुतांश वेळा कुटुंबाच्या परिचयातील असतात. त्यामुळे पालकांनी आपल्या घरी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीविषयी माहिती ठेवणे गरजेचे असल्याचे राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी व्यक्त केले. आपले मूल आपण विश्वासार्ह व्यक्तीकडेच सोपवले आहे का,याची खातरजमा नियमित करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
मागील काही वर्षांमध्ये बालकांवर घडणाऱ्या गुन्ह्य़ांमध्ये वाढ झाल्याचे राष्ट्रीय गुन्हेगारी अहवालामधून स्पष्ट झाले असले तरी गुन्हे नोंदविण्याचे प्रमाण वाढल्याने ही आकडेवारी वाढत आहे. बालकांच्या सुरक्षिततेसोबतच अशा गुन्ह्य़ांना बळी पडलेल्या मुलांसाठी तयार करण्यात आलेल्या बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध (पॉस्को) कायद्याची अंमलबजावणीही योग्यरीतीने होत नसल्याचे ‘सेव्ह चिल्ड्रन’ या संस्थेचे बालकांची सुरक्षितता या विषयाचे सल्लागार प्रभात कुमार यांनी मांडले. या कायद्यान्वये मुलांना मोकळेपणाने व्यक्त होता यावे यासाठी पूरक असे कोर्ट उभारावेत, भाषेची अडचण येऊ नये यासाठी खास प्रशिक्षक असावेत, तसेच मुलांवरील दडपण दूर करण्यासाठी समपुदशेक असावेत, अशा अनेक बाबींची पूर्तता अद्याप झालेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. चाइल्ड राइट अॅण्ड यू (क्राय) संस्थेने काही महिन्यांपूर्वी झोपडपट्टी भागात केलेल्या अभ्यासात मुलामुलींनी त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात असुरक्षित वाटत असल्याचे नोंदविले होते. यात विशेषत: काही मुलींनी मैत्रिणी सोबत नसतील तर शाळेत जाणे टाळल्याचे म्हटले होते.
हे लक्षात ठेवा
* मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा आणि मुलांचे म्हणणे ऐका. त्यांच्याशी वारंवार गप्पा मारत असताना त्यांच्या आयुष्यामध्ये काय सुरू आहे, याचा मागोवा घ्या.
* मुलाचे विचार, कल्पना, कामगिरी आदी गोष्टींना प्रोत्साहन द्या. निराशाजनक किंवा तुलनात्मक विधाने करून त्यांचा हिरमोड करू नका.
* मुलांच्या कोणत्याही वर्तनावरून तुम्ही रागावले असल्यास शांत झाल्यावर त्यांच्याशी याबाबत चर्चा करा. शारीरीक शिक्षा करून शिस्त लावता येते हा गैरसमज आहे.
* परिचित किंवा अपरिचित व्यक्तींच्या वागण्यामुळे अस्वस्थ किंवा असुरक्षित वाटत असल्यास अशा कृतींना नाही म्हणण्याचा हक्क मुलांना आहे, असे त्यांना वारंवार सांगा.
* असुरक्षित किंवा अस्वस्थ वाटत असल्यास तुमच्याशी मोकळेपणाने बोलण्यास त्यांना सांगा. अशावेळी पालक म्हणून तुम्ही उपस्थित नसाल तर त्यावेळी कोणत्याही मोठय़ा व्यक्तीची मदत घेणे फायदेशीर असल्याचे मुलांना पटवून द्या.
सोसायटय़ांचा बेजबाबदारपणा
राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी गृहनिर्माण संस्थांकडून सुरक्षा उपाययोजनांवरही बोट ठेवले. सोसायटय़ांच्या आवारात सीसीटीव्ही बसवणे, सुरक्षारक्षकांची नेमणूक करणे याबाबत सूचना देऊनही दुर्लक्ष केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. सोसायटय़ा ‘आमच्याकडे आतापर्यंत असे काही घडले नाही’ असे सांगत सुरक्षेकडे कानाडोळा करतात. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
दुसऱ्या व्यक्तीने तुमच्या शरीराचे अंतर्भाग पाहणे, त्यांना स्पर्श करणे किंवा त्याविषयी बोलणे चुकीचे असून असे कोणी करत असल्यास त्याला ठामपणे नकार देऊन तेथून निघून जावे, हे मुलांना समजावणे आवश्यक आहे.
Source: Loksatta